कराड दक्षिणसाठी 13.41 कोटी

ना. डॉ. अतुल भोसले यांचे प्रयत्न : अर्थसंकल्पात विशेष तरतूद

कराड – कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकास कामांसाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून अर्थसंकल्पात 13 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे कराड दक्षिणमधील दळणवळण व्यवस्था आणखी गतिमान होणार असून त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे.

कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी ना. डॉ. अतुल भोसले सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. याबाबत शासनस्तरावर त्यांच्यामार्फत दाखल झालेल्या प्रस्तावांची आणि मागण्यांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर विकासकामांच्या पूर्ततेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्ग कराड ते चचेगाव (1.50 कोटी), रयत कारखाना ते जिल्हा हद्द (2.80 कोटी), येवती-भुरभुशी ते जिल्हा हद्द (2 कोटी), येणके ते कोळे (1.20 कोटी), सुपने ते किरपे आणि आणे ते अंबवडे (1 कोटी), राष्ट्रीय महामार्ग 4 ते कालवडे (51 लाख), शेणोली स्टेशन ते शिरसगाव (80 लाख), येवती ते पाटीलवाडी (1.20 कोटी), गोंदी फाटा ते रेठरे बुद्रुक आणि खुबी ते कृष्णा कारखाना (2.40 कोटी) या मार्गांचे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील लोकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार असल्याने कराड दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून ना. डॉ. अतुल भोसले यांच्यासह भाजप सरकारचे आभार मानण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.