13 रिजन्स वाय – सिजन 2

जगभरातील वेब सिरीज चाहते बऱ्याच दिवसांपासून ज्या सिरीजची वाट पाहत होते अशी “13 रिजन्स वाय-2” 18 मे ला नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित झाली. ‘जे ऍश’ यांच्या बेस्ट सेलर पुस्तकावर आधारित असलेली ही मालिका क्‍ले जेंसन(डिलन मिनेट) आणि त्याची वर्गमैत्रिण हॅना बेकर(कॅथरीन लॉंगफोर्ड) या पात्रांवर केंद्रित आहे. पहिल्या सिजनमध्ये आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टींमुळे खचलेली हॅना तणावाला त्रासून स्वतःला संपवण्याचा मार्ग स्वीकारते. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूला जवाबदार व्यक्ती आणि घटनांचा उल्लेख असणाऱ्या 13 कॅसेट्‌स रेकॉर्ड करते.

तिच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर या टेप्स क्‍ले जेंसनला त्याच्या घरासमोर एका बॉक्‍स मध्ये आढळतात. क्‍ले एक एक करून कॅसेट ऐकतो आणि त्याबरोबरच हॅना बकेरच्या मृत्यूमागची कारणे एक एक करत उलगडत जातात. अशाप्रकारे हॅनाची मृत्यूला कारणीभूत भावनिक गुंतागुंत, गैरसमज आणि हृदयद्रावक अंतासोबतच आपल्या वर्गमैत्रिणीच्या मृत्यूमागचे आपणसुद्धा एक कारण आहोत हे समजल्यामुळे व्यथित झालेला क्‍ले आणि बाकीची कारणे जाणून घेण्यासाठी त्याची धडपड ’13 रिजन्स वाय’च्या पहिल्या सिजनमध्ये दाखवण्यात आली. मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला दुसरा सिजनसुद्धा हॅनाच्या मृत्यूवर आधारित आहे किंबहुना तिच्या मृत्यूच्या कारणांना बारकाईने दर्शविणारा आहे. या सिजनमध्ये बेकर कुटुंबिय आपल्या मुलीच्या आत्महत्येसाठी शाळेला जवाबदार धरून उच्च न्यायालयात अपील करतात. जिथे प्रत्येक पात्र हॅनाच्या मृत्यूला विसरून आपापल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करत असतो तिथे पुन्हा हा खटला चालू झाल्याने त्यांची होणारी भावनिक उलथापालथ आणि मृत्यूमागील कारणांची उकल नव्याने दाखवण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुठल्याही पुस्तकावर सिनेमा अथवा मालिका काढणं हे जिकीरीचे काम असते. आधीच पुस्तक वाचल्यामुळे मालिकेत काय होईल आणि शेवटी काय असेल याचा सर्वांना अंदाजा आलेला असतो. अशा वेळी प्रेक्षकांना खिळवून ठेवणं तसेच कथेत काही बदल करणं आवश्‍यक असते. या ठिकाणी दिग्दर्शकाचं कसब पणाला लागतं. ‘ब्रायन योर्के’ एक दिग्दर्शक म्हणून येथे आपली जवाबदारी चोखपणे पार पाडली आहे. सगळी पात्र त्यांनी खुबीने रंगवली आहेत. सिरीज पाहताना प्रत्येक पात्र आपल्या ठिकाणी बरोबर वाटणे हेच त्यांचे यश आहे. पहिल्या सिजन प्रमाणेच दुसरा सिजनसुद्धा तितकाच उत्कंठावर्धक असणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. म्हणूनच नवीन विषय, उत्कंठा जागवणारी कथा आणि उत्तम अभिनयाला उत्कृष्ट दिग्दर्शनाची जोड असणारा “13 रिजन्स वाय”चा दुसरा सिजन नक्कीच पहावा असा आहे.

शिवम पिंपळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)