पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा बारावीचा निकाल 94.44 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये 96 टक्के मुलींनी बाजी मारली. तर 92 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत निकाल काही प्रमाणात घटला आहे. शहरात एकूण 16 हजार 976 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.25) दुपारी अडीच वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. गती वर्षी तांत्रिक कारणामुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्याच्याशी संबंधित कामे लांबल्याने निकाल जूनमध्ये जाहिर झाला होता. यंदाच्या वर्षी वेळेवर मे महिन्यात निकाल जाहिर झाला. शहरातील बहुतांश पालक आणि मुलांनी घरातच बसून मोबाईल, लॅपटॉपवर आपल्या पाल्याचा निकाल पाहिला. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन निकाल पाहण्याची सोय नव्हती, अशा विद्यार्थ्यांसाठी खास शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती.
पिंपरी-चिंचवड शहरातून 18 हजार 76 विद्यार्थांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9 हजार 538 विद्यार्थी, तर 8 हजार 437विद्यार्थिनी असे एकूण 17 हजार 975 विद्यार्थांनी परीक्षा दिली. त्यापैकी 8 हजार 849 विद्यार्थी आणि 8 हजार 127 विद्यार्थिनी असे मिळून 16 हजार 976 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 96.32 टक्के मुलींनी बाजी मारली आहे. तर 92.77 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
100 टक्के निकाल लागलेली महाविद्यालये
शहरातील विविध 29 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये 41 महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेचा, 29 महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर, कला शाखेच्या अवघ्या 8 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर व्होकेशनल तीन महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे.
उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचा टक्का वाढला
12 वीच्या परिक्षेत उत्तीर्ण होण्याचा मुलींचा टक्का यंदाच्या वर्षी वाढला आहे. गतवर्षी 7 हजार 761 विद्यार्थिनी परिक्षेला उर्त्तीण झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी ही संख्या 366 वाढली आहे. गतवर्षी मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 95.42 होता. यंदाच्या वर्षी तो 96.32 झाला आहे. तर मुलांचा उर्त्तीण होण्याचा टक्का घसरला आहे. गतवर्षी 93.98 टक्के मुले उर्त्तीण झाली होती. यंदा 92.77 टक्केच मुले उत्तीर्ण झाली आहेत.