पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बारावीची परीक्षा सुरू होणार असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
शरद गोसावी म्हणाले की, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच 15 मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असेल. या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली आहेत. तर 37 ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. या पैकी 7 लाख 68 हजार 967 विद्यार्थी विज्ञान शाखेची परीक्षा देणार आहेत. 3 लाख 80 हजार 410 विद्यार्थी कला शाखेची तर 3 लाख 19 हजार 439 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत, अशी माहिती गोसावी यांनी दिली आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एकुण ८१८ परीक्षा केंद्रावर यापुर्वी कॉपीच्या गैरमार्गाची प्रकरणे आढळलेली आहेत. त्यामुळे आता या परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती करताना अदलाबदल करण्यात येणार आहे.
पुणे – १२५, नागपूर – १०४, छत्रपती संभाजीनगर – २०५, मुंबई – ५७ , कोल्हापूर – ३९, अमरावती – १२४, नाशिक – ८८, लातूर – ७३, कोकण – ३ याप्रमाणे परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्यात येणार आहे, अशी महिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
यंदाही दहा मिनिटांचा अधिक वेळ
यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवरही थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रलोभनांना बळी पडू नये आणि शांतपणे पेपर लिहावेत. कोणत्याही प्रकारे कॉपी करू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे
राज्य मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लेखी परीक्षेनंतर १२ मार्च, १५ मार्च, १७ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी या परीक्षांचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत.
परीक्षेचा निकाल १५ मेपुर्वी लागणार
यंदा इयत्ता बारावी, दहावीची परीक्षा १० दिवस आधी घेण्यात येत आहे. त्यामुळे या परीक्षांचे निकाल १५ मे पुर्वी लागणार आहे. पुरवणी परीक्षाही लवकर घेऊन त्याचा निकालही तात्काळ लावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी पुर्ण वेळ देता येणार आहे. इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रियाही लवकर पुर्ण करुन १ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
– यंदा विद्यार्थ्यांची संख्या ८ हजारांनी घटली
– राज्यात २७१ भरारी पथके नियुक्त
– संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराव्दारे वॉच
– व्हिडीओ चित्रीकरणासाठी अतिरिक्त निधी
– कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्र मान्यता कायमची रद्द