नवी दिल्ली : बॅंक गैरव्यवहारप्रकरणाच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका माध्यम समुहाची तब्बल 127 कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचलनालयाने जप्त केली आहे. हे प्रकरण पिक्सन समूहाशी संबंधित आहे. पिक्सियन मिडीया प्रा. लि., पर्ल मिडीया प्रा.लि., महुआ प्रा.लि., पिक्सन व्हिजन प्रा.लि., पर्ल स्टुडिओ प्रा.लि. पर्ल व्हिजन प्रा.लि., सेंच्युरी कम्युनिकेशन लि. आणि त्या कंपन्यांचे संचालक पी.के.तेवारी, आनंद तेवारी. अभिषेक तेवारी आणि अन्य व्यक्तींच्याविरोधात प्रकरण दाखल करण्यात आले आहे, असे “ईडी’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“पीएमएलए’ अंतर्गत 127.44 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. त्यामध्ये 11 व्यवसायिक भूखंड आणि मुंबई, चेन्नई, नोएडा अिांण कोलकत्यातील समूहाच्या कंपन्यांच्या मालकीचे मजलेही आहेत, असे “इडी’च्या निवेदनात म्हटले आहे. पिक्सियन ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक असलेल्या आरोपींनी विविध बॅंकांकडून 2,600 कोटी रुपयांचे कर्ज फसवणूक केली होते. आरोपींनी कर्जाची रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये फिरवली आणि त्याचा विनियोग विविध ठिकाणची मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला गेला, असे सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे.