पिंपरी – पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने धोकादायक इमारतींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील तब्बल सव्वाशे इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे उघड झाले आहे. या धोकादायक इमारतीच्या मालकांना महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. विशेष बाब म्हणजे तिथे राहत असलेल्या भाडेकरु नागरिकांनी दुरुस्तीबाबत सूचना केल्यानंतर पालिकेने त्याची दखल घेतली आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींना महापालिकेच्या प्रभागस्तरीय कार्यालयांच्या वतीने नोटीस देण्यात येते. पावसाळ्यात वादळ आणि पावसाचा जोर वाढल्यास अशा धोकादायक इमारतीचा काही भाग किंवा इमारतच ढासळू शकते. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका व संभाव्य जीवितहानी दूर करण्याच्या दृष्टीने धोकादायक इमारतीचा भाग काढून घ्यावा, दुरुस्ती करावी. तसेच धोकादायक इमारती काढून घ्याव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे.
एखादी इमारत, तिचा काही भाग, छप्पर, जिना धोक्याच्या अथवा पडण्याच्या स्थितीत असल्यास याबाबत महापालिकेस लेखी कळवावे. अशा इमारतींची पाहणी करून धोका नाहीसा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहे, किंवा एखादी इमारत अथवा इमारतीचा भाग आकस्मिक रित्या कोसळल्यास दुर्घटना घडल्याची माहिती महापालिकेला (दूरध्वनी क्रमांक 27425511 व 67333333) कळवावी.
महापालिका अधिनियम कलम 265 अन्वये इमारतीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही त्या इमारतीच्या मालकाची आहे. यामुळे इमारत सुस्थितीत आहे की नाही, इमारतीला काही धोका तर नाही ना? याची तज्ज्ञ अभियंत्यांकडून तपासणी करुन घेणे आणि वेळीच आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे न केल्यास आणि काही दुर्घटना घडल्यास त्यासाठी इमारत मालकाला जबाबदार धरुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
इमारत सुरक्षित राखण्याची जबाबदारी महापालिका अधिनियम कलम 265 अन्वये प्रत्येक इमारत मालकाची आहे. त्यासाठी इमारतीची तपासणी तज्ज्ञ अभियंता यांच्याकडून करून घ्यावी. त्यांच्या सूचनेनुसार इमारत दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– मकरंद निकम, शहर अभियंता
जुन्या इमारतींची पाहणी करणार
पावसाळ्यात नागरिकांनी धोक्याच्या इमारतीमध्ये न राहता दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करणे अधिक योग्य होईल. धोक्याच्या इमारतींबाबत दुरुस्तीसाठी मालक अथवा भाडेकरु यांच्याकडून येणा-या अर्जाचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. पावसाळा सुरू होत असल्याने जुन्या इमारतींना पावसाळ्यामुळे धोका निर्माण होतो, अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना व त्या इमारतीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. तो टाळण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने जुन्या इमारतींची पाहणी केली जाणार आहे.