एकाच दिवशी 124 ‘करोनाबाधित’ :तीन जणांचा मृत्यू

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात अवघ्या 20 दिवसांत 1 हजार 141 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. तर शहरातील एकूण मृतांची संख्या 28 झाली आहे. शनिवारी एकाच दिवशी 124 जणांना करोनाची लागण झाली. तर तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

गेले तीन दिवस एकाचदिवशी शंभरहून अधिक रुग्ण शहरात आढळत आहेत. विशेष म्हणजे ज्या भागातील करोनाबाधित रुग्ण बरे होऊन तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून वगळण्यात आला होता. त्या भागातही रुग्ण आढळत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. 1 जून रोजी शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 535 इतकी होती. गेल्या 20 दिवसांमध्ये यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. 10 जूनला यामध्ये वाढ होऊन करोनाबाधित रुग्णांची संख्या 1110 म्हणजेच अवघ्या दहा दिवसांत 566 रुग्णांची वाढ झाली. एवढे रुग्ण करोना विषाणूचा फैलाव सुरु झाल्यापासून म्हणजेच 11 मार्च ते 31 मे या कालावधीतही आढळळे नव्हते. या कालवधीत साडेपाचशे रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर 11 जून पासून आजपर्यंत 535 रुग्णांची वाढ झाली आहे. म्हणजेच अवघ्या 20 दिवसांत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 1154 इतकी वाढ झाली आहे. शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 1676 इतकी झाली.

जूनमध्ये सर्वाधिक मृत्यू सुरुवातीला आटोक्‍यात असणारा “करोना’ शहराला “रेड झोन’मधून बाहेर काढल्यानंतर आणि दारु विक्रीला परवानगी दिल्यानंतर खूपच झपाट्याने आपले पाय पसरत आहे. त्याचबरोबर “करोना’मुळे सर्वाधिक मृत्यू जूनच्या याच वीस दिवसांमध्ये झाल्याचेही दिसून येत आहे. एक जूनपर्यंत “करोना’मुळे शहरातील 8 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 12 अशा एकूण 20 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जूनच्या 20 दिवसांमध्ये शहरातील 28 आणि शहराबाहेरील 23 अशा एकूण 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानुसार अडीच महिन्यात 20 तर वीस दिवसांमध्ये 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी शहरातील 107 रुग्णांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये 67 पुरुष व 40 महिलांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील 7 पुरुष व 10 महिला अशा 17 जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच तीन जणांचा करोनामुळे रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील क्रांतीनगर आकुर्डी येथील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शहराबाहेरील कोथरुड येथील 57 वर्षीय महिला व जुन्नर येथील 30 वर्षीय तरुणीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सद्यस्थितीत शहरातील 601 व शहराबाहेरील 66 अशा 667 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम व नवीन भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हजारहून अधिक करोनामुक्‍त

शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी दिलासा देणारी आहे. आजपर्यंत शहरातील 1037 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शनिवारी एकाच दिवशी 83 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे करोनामुक्‍त झालेल्या रुग्णांची संख्या 1037 इतकी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.