लिबीयामध्ये हिंसाचारात 120 ठार

त्रिपोली (लिबीया) – लिबीयाची राजधानी त्रिपोलीमध्ये खलिफा हफ्तार यांनी या महिन्याच्या सुरुवातीला केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 121 जण ठार झाले आहेत. जगतिक आरोग्य संघटनेने आज ट्विटरवर ही माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने लिबीयामध्ये वैद्यकीय सेवा आणि औषधे पुरवण्यात येत आहे. या महिन्याच्या 4 तारखेपासून सुरू झालेल्या हिंसाचारादरम्यान आरोग्य सेवा कर्मचारी आणि “डब्लूटीओ’ची वाहनांवर सातत्याने हल्ले होत असल्याबद्दल “डब्लूटीओ’ने तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.

हाफ्तार यांच्या सैन्याने लिबीयात संयुक्‍त राष्ट्राच्या पाठिंब्यावरील सरकारच्या समर्थक गटांवर जोरदार हल्ला चढवला आहे आणि लिबीयाच्या पूर्वभागावर नियंत्रण मिळवले आहे. हा अंतर्गत हिंसाचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेले आवाहन हाफ्तर यांनी धुडकावून लावले आहे. या हिंसाचारामुळे सुमारे 13,500 लोकांना विस्थापित व्हायला लागले आहे, तर 900 जणांना आश्रय छावण्यांमध्ये रहावे लागले आहे, असे संयुक्‍त राष्ट्राच्या मानवी हित रक्षक गटाने म्हटले आहे. तोफागोळ्यांच्या माऱ्यामुळे आतापर्यंत तीन आरोग्यसेवक ठार झाले आणि 5 रुग्णवाहिका उद्‌ध्वस्त झाल्या आहेत.
जमिनीवरील युद्धाबरोबरच सरकारी बाजू आणि बंडखोरांनी हवाई हल्लेही करायला सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप दोन्ही बाजूकडून केला जात आहे.

लिबीयाचा हुकुमशहा मोअमर गद्दाफीची सत्ता 2011 साली नाटो सैन्याने उलथवून टाकली व गद्दाफीचा खात्मा केला. त्यानंतर लिबीयातील विविध गट सत्ता ताब्यात घेण्यासाठी एकमेकांशी संघर्ष करत आहेत. संयुक्‍त राष्ट्राच्या पाठिंब्याने फयेझ अल सराज यांचे सरकार तेथे स्थापन झाले आहे. मात्र स्थानिक गटांचा सराज सरकारला विरोध आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.