एखादा चित्रपट यशस्वी होतो तेव्हा त्याचा फायदा विशेषतः आर्थिक स्वरूपातील केवळ निर्मात्यांनाच होतो असे नाही; तर कलाकारांना होतो. चित्रपटाच्या यशामुळे मिळणाऱ्या ग्लॅमरच्या आणि कौतुकवर्षावाच्या सरींमध्ये न्हाऊन निघत असतानाच हळूहळू आपल्या मानधनातही वाढ करण्यास सुरुवात करतात.
त्यातूनच आज यशस्वी, आघाडीच्या नायक-नायिकांचे मानधन 50 कोटींच्याही पुढे गेले आहे. त्यापुढे जात आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षयकुमार याने 120 कोटींची एक डील साईन केली आहे म्हणे! आनंद एल रायच्या चित्रपटासाठी ही भरभक्कम फी अक्षयने आकारल्याचे समजते आहे.
अक्षयच्या “गुड न्यूज’ चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. गतवर्षी अक्षयचे “केसरी’, “मिशन मंगल’, “हाऊसफुल 4′ आणि “गुड न्यूज’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. यातील “केसरी’ने 154 कोटी, हाऊसफुल-4 ने 194 कोटींची कमाई केली.
आज बॉलीवूडमधील बहुतांश कलाकार वर्षाकाठी एक किंवा दोन चित्रपट करतात; पण अक्षयकुमार हा पठ्ठ्या वर्षाला चार-चार चित्रपट करतो. विशेष म्हणजे असे असूनही त्याचे चित्रपट 100-200 कोटींच्या क्लबमध्ये जाऊन पोहोचतात. गेल्या वर्षी अक्षयअभिनित चित्रपटांनी 750 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.
यावर्षी अक्षयचे “सूर्यवंशी’, “लक्ष्मी बॉम्ब’, “पृथ्वीराज’ आणि “बच्चन पांडे’ हे चित्रपट येत आहेत. अक्षयचे मानधन विचारात घेतले तर अक्की यावर्षी स्वतः 300 कोटींच्या क्लबमध्ये जाऊन बसेल!