दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान
रेडा – इंदापूर येथे दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत 12 महिला व अपंग बचत गटास फिरता निधी पत्राचे वाटप एका विशेष समारंभामध्ये इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते करण्यात आले. गटाच्या बॅंक खात्यात प्रतिगट रुपये दहा हजार रुपयांप्रमाणे निधी जमा करण्यात आला.
धनसंचय महिला बचत गट, महिला बचत गट, अहिल्याबाई होळकर महिला बचत गट, राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट, यमाई महिला बचत गट, उत्कर्ष अपंग पुरुष बचत गट, दिव्या महिला बचत गट, भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, दत्तकृपा महिला बचत गट, शिव महिला बचत गट, रोशनी महिला बचत गट, स्वामी समर्थ अपंग महिला बचत गट यांना या निधीपत्राचे वाटप करण्यात आले.
नगराध्यक्ष शहा म्हणाल्या की, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. या गटाच्या माध्यमांमधून महिलांमध्ये संवाद साधला जाऊन आर्थिक व सामाजिक जडणघडणीत हा बचत गट अधिकच हितवाहक होत आहे. या विचार विनिमयातून व्यवसाय सुरूवात होत आहे.
गटाच्या अध्यक्षा संगीता क्षीरसागर म्हणाल्या की, शहरातील सरस्वतीनगर भागातील भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाने कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. नगरपरिषदेच्या वतीने ब्युटीपार्लर लेवल वन हा कोर्स दारिद्रयरेषेखालील महिलांसाठी, बेसिक संगणक हा कोर्स सर्व महिलांसाठी मोफत असल्याची माहिती सहायक प्रकल्प अधिकारी सुभाष ओव्हाळ यांनी दिली. महिलांनी यावेळी प्लॅस्टिक बंदी व स्वच्छतेची शपथ घेतली. वृषाली जाधव यांनी शपथ दिली. कार्यालयीन अधीक्षक वर्षा क्षीरसागर यावेळी उपस्थित होत्या. अल्ताप पठाण यांनी आभार मानले.