211 व्हेंटिलेटर तर 2482 ऑक्सिजन बेड रिकामेच : करोना रुग्ण घटल्याचा परिणाम
पुणे – शहरात गेल्या आठ महिन्यांपासून म्हणजे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत करोनाच्या साथीमुळे शासकीय तसेच खासगी रुग्णालयांची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती. या कालावधीत शहरातील सक्रिय बाधित रुग्णांचा आकडा 22 हजारांपर्यंत गेल्याने करोना रुग्णांना आवश्यक असलेले बेडही मिळणे कठीण झाले होते.
मात्र, दोन आठवड्यांपासून करोना रुग्णांची संख्या घटण्यास सुरुवात झाल्याने करोना रुग्णांवरील उपचारासाठीचे तब्बल 12 हजार 834 बेड रिकामे आहेत. त्यात, सुमारे 211 व्हेंटिलेटर तर 2482 ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. तर ससून रुग्णालयात तब्बल 77 व्हेंटिलेटर रिकामे आहेत.
शहरात 9 मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर आज अखेरपर्यंत एकूण 1 लाख 61 हजार 844 पर्यंत गेला आहे. त्यात, सुमारे 4 हजार 259 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 1 लाख 51 हजार 889 जण या आजारातून बरे झाले आहेत. या साथीने जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शहरात थैमान घातले होते. या कालावधीत शहरात तब्बल 22 हजारहून अधिक सक्रिय बाधित होते. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून 84 खासगी हॉस्पिटलचे बेड ताब्यात घेतले होते.
तसेच ससूनसह महापालिकेचीही 9 रुग्णालये होती. या सर्व रुग्णालयांच्या तब्बल 15 हजार 417 खाटांची सुविधा सज्ज ठेवली होती. त्या, खाटांवर आज अखेर केवळ 2583 रुग्ण उपचार घेत असून 12 हजार 834 खाटा रिकाम्या आहे.
ससूनमधील 74 व्हेंटिलेटर रिकामे
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यांत पहिल्यादांच ससूनमधील ऑक्सिजन ते व्हेंटिलेटर बेड रिकामे आहेत. करोना रुग्णांवरील उपचारासाठी ससूनमध्ये 510 बेडची सुविधा आहे. त्यात 382 ऑक्सिजनचे 18 ऑक्सिननची सुविधा नसलेले आयसीयू बेड तसेच 110 व्हेंटिलेटरचे बेड आहेत. त्यात, ऑक्सिजनची सुविधा असलेले 334 बेड रिकामे असून 11 आयसीयू बेड तर तब्बल 74 व्हेंटिलेटर बेड रिकामे आहेत.
करोनाच्या काळात खासगी रुग्णालयात उपचार परवडत नसल्याने ससून रुग्णायलावर मोठा ताण आला होता. तर त्या ठिकाणी वेळेवर बेड न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला होता. मात्र, आता हेच ससून रुग्णालय रिकामे पडल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.