विमानतळ पोलिसांनी केली त्याला अटक
पुणे: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकानेच तब्बल 12 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मधल्या सुट्टीत तो विद्यार्थिनींना बोलावून विनयभंग करत असे. मागील सहा महिन्यापासून चालु असलेल्या या प्रकाराबाबत विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला 18 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालायने दिला आहे.
विक्रम शंकर पोतदार (वय 42 ) असे अटक केलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात नीलिमा मधुकर म्हेत्रे ( वय 43, रा. जेजुरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्षकाविरोधात विनयभंग करणे तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पंचायत समिती हवेली येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हवेली तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोपी हा शिक्षक म्हणून नोकरी करतो. शिक्षक असल्याचा गैरफायदा घेत त्याने शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलींना मधल्या सुट्टीत स्वत: जवळ बोलावून घेत तसेच मुलींच्या मनास लज्जा होईल असे कृत्य करायचा. दि. 8 मे 2019 रोजी हा प्रकार उघडकीस आला.
शाळेच्या केंद्रप्रमुखांनी एक शिक्षक वर्गातील विद्यार्थिनींशी करीत असलेल्या अश्लिल प्रकाराबाबत शाळेतील वरिष्ठ शिक्षकाने फिर्यादी अधिकाऱ्यांना पत्र लिहून माहिती दिली. यामध्ये वरिष्ठांनी चौकशी केल्यानंतर शिक्षकाने मुलींचा विनयभंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची समजात शिक्षकाकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्याने पेशाला काळीमा फासणारी घटना केली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक सी.एस. चौधरी या करीत आहेत.