पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत अधिकाऱ्यांची 23 पदे मंजूर असून त्यातील 12 रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त कामाचा भार पडतो आहे.
परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी विविध परीक्षा घेण्यात येतात. परीक्षांचे अर्ज मागविण्यापासून ते निकाल लावण्यापर्यंत सर्व कामांचे नियोजन अधिकाऱ्यांनाच करावे लागते. परीक्षा घेण्याचा ठेका खासगी एजन्सीला दिला जातो. मात्र, त्यावर नियंत्रण अधिकाऱ्यांनाच ठेवावे लागते. मागील काही वर्षांपासून परीक्षा परिषदेतील बरीचशी पदे रिक्त आहेत.
परीक्षा परिषदेत अधिकाऱ्यांची 11 पदे भरली आहेत. उर्वरित रिक्त आहेत. अध्यक्षपद हे शिक्षण संचालक दर्जाचे व आयुक्तांचे पद हे सहसंचालक दर्जाचे आहे. ही दोन्ही पदे रिक्त आहे. या दोन्ही पदांची प्रभारी पदाची सूत्रे तुकाराम सुपे यांच्याकडे आहेत. उपायुक्तांची दोन रिक्त पदे गेल्या डिसेंबरमध्ये भरली. त्यात हारून आत्तार, शैलजा दराडे यांची वर्णी लागली. सहायक आयुक्तांची चार पदे मंजूर असून त्यातील दोन पदे भरली आहेत. प्रशासन अधिकारी पदही रिक्त आहे. अधिक्षकांची पाचही पदे भरली आहेत.
उपशिक्षणाधिकारी दर्जा असलेल्या मूल्यमापन अधिकाऱ्यांची सहा पदे मंजूर असून त्यातील पाच रिक्त आहेत. कार्यक्रम संयोजन अधिकाऱ्याचे एक पद, लेखाधिकाऱ्याचे एक पदही रिक्त आहे. दरम्यान, आगामी प्रशासकीय बदल्यांच्या हंगामात परीक्षा परिषदेतील तीन-चार अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर ठिकाणच्या कार्यालयात निश्चितच होणार आहेत. पुण्यात “सोयी’च्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी अधिकाऱ्यांचे जोरदार प्रयत्नही सुरु आहेत.