श्रीगोंदा – तालुक्यात आज दिवसभरात करोनाचे तब्बल 12 नवे रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली. या 12 रुग्णांत श्रीगोंदा शहरातील एकाच कुटुंबातील 7 रुग्ण आहेत. अद्याप 22 जणांचे अहवाल पेंडिंग आहेत, या अहवालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीगोंदा शहरातील एक डॉक्टर करोना बाधित आढळून आला होता. या डॉक्टरच्या कुटुंबातील 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर त्या कुटुंबाकडे काम करणारी एक महिला देखील बाधित आढळून आली आहे. कोळगाव, वडाळी, लोणी व्यंकनाथ व गार येथे प्रत्येकी एक, असे एकूण 12 जण करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
आज एकाच दिवसात 12 जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने करोनाचा मोठी दहशत पसरली असून, कामाशिवाय लोकांचे फिरणे महागात पडत असल्याचे समोर आले आहे. शहरातील आता एकाच कुटुंबात आठ जण करोनाबाधित झाले आहेत. तर लोणी व्यंकनाथ येथील व्यक्ती अनेक महत्त्वाच्या लोकांच्या संपर्कात आल्याने चिंता वाढली आहे. भीमाकाठच्या गार गावातही करोना शिरला आहे. तेथे दौंडमधून करोना आल्याचे समजते.
जी व्यक्ती बाधित आहे, ती दौंड येथे दूध पुरवठा करण्यासाठी जात असल्याचे समोर आले आहे. एकूणच, तालुक्यात करोनाने चांगलेच थैमान घातले असून, आता नागरिकांनी अधिकची खबरदारी घेणे अत्यावश्यक बनले आहे. प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई सुरू केली आहे.