वाहतूक खोळंबा आणि पथारी प्रश्नी संयुक्त समिती : महापालिकेत बैठक
प्रशासनाच्या कारवाईवर पथारी व्यावसायिक आक्रमक
लवकरच नियोजनात्मक पाऊल उचलण्याचे संकेत
पुणे – शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी प्रमुख 12 रस्त्यांच्या पथारींवर कारवाईची संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. मात्र, यात महापालिकेने परवाना दिलेल्या व्यावसायिकांवर कारवाई होत असून, या प्रकरणी पथारी व्यावसायिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांसह वाहतूक आणि परिवहन अधिकारी, महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.
वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे आणि पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन यासारख्या प्रश्नांबाबत संयुक्त समिती करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. महापौर मोहोळ यांनी ही माहिती दिली. उपमहापौर सरस्वती शेंडगे, पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक दीपक पोटे, उमेश गायकवाड, गायत्री खडके, अजय खेडेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतनू गोयल, वाहतूक पोलीस अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे, प्रादेशिक परिवहन विभागाचे उपायुक्त संजीव भोर यावेळी उपस्थित होते.
आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘नो हॉकर्स झोन, मान्यताप्राप्त रस्ते, महत्त्वाचे रस्ते, गर्दीचे चौक, रस्ते व त्या परिसरातील वाहतूक नियमन, पथारी व्यावसायिक व अतिक्रमणे याबाबत बैठकीतील चर्चा व समितीमधील निर्णयानुसार प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, निर्णयापूर्वी संबंधितांशी चर्चा, जागा पाहणी आणि परिसरानुसार करावयाचे नियोजन करण्यात येईल.
नागरिकांचा प्रवास सुसह्य, सुरळीत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. या बैठकीच्या माध्यमातून एकत्रितपणे मते जाणून घेत त्यावरील उपाययोजननांची प्रभावीपणे अंमलबजावणी तातडीने करणार आहोत.
– मुरलीधर मोहोळ, महापौर
शहरातील वाहतूक समस्या त्याचप्रमाणे शहरातील अपघाताची संख्या कमी करण्यास आणि वाहतुकीच्या सुरळीत, संरक्षितपणामुळे नागरिकांना शहर सुसह्य वाहतुकीस योग्य वाटेल, यासाठी दोन्ही विभागांकडून यशस्वी कामकाज नियोजन होऊन वाहतूक समस्या निराकरणासाठी मदतच होईल.
– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त.