Maha Kumbh Mela 2025 – तेरा जानेवारी रोजी महा कुंभमेळा प्रयागराज येथे सुरू झाला असून 26 फेब्रुवारी पर्यंत तो चालणार आहे. या कुंभमेळ्यात किमान 40 कोटी लोक सहभागी होणार आहेत. यामुळे उत्तर प्रदेशाच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपाचे 12 लाख रोजगार निर्माण झाले असल्याची माहिती एनएलबी सर्विसेस या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अलुग यांनी दिली.
कुंभमेळामुळे उत्तर प्रदेशाच्या अनेक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा विकास, कार्यक्रम व्यवस्थापन, सुरक्षा, सेवा, स्थानिक व्यापार, पर्यटन, मनोरंजन, फलोत्पादन आणि विविध वस्तूंची विक्री यांचा समावेश आहे. एकट्या पर्यटन आणि आदरातिथ्या उद्योगात साडेचार लाख रोजगार निर्मिती झाली आहे. वाहतूक आणि मालवाहतूक क्षेत्रात तब्बल तीन लाख रोजगार निर्माण झाले आहेत. वैद्यकीय सेवा क्षेत्रात दिड लाख अस्थाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रिटेल क्षेत्रातही तात्पुरते एक लाख रोजगार निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले.
देशभरातील कारागिरांसाठी सोहळ्याच्या ठिकाणी 6,000 चौरस मीटरच्या क्षेत्रात पसरलेल्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अर्थात एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेचे आकर्षक प्रदर्शन भरवले गेले आहे. या प्रदर्शनात मांडलेले गालिचे, झरी-जरदोसी, फिरोजाबाद मधली काचेची खेळणी, वाराणसीतील लाकडी खेळणी आणि इतर हस्तकलेची उत्पादने अशा वस्तू भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरू लागल्या आहेत.
2019 मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी 4.30 कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल झाली होती आणि यंदा ही व्यवसायिक उलाढाल 35 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा प्रयागराज विभागाचे सह उद्योग आयुक्त शरद टंडन यांनी व्यक्त केली आहे. यामुळे व्यवसाय आणि रोजगार निर्मितीचे नवे मार्ग निर्माण होतील असेही त्यांनी म्हटले आहे.
यंदा महाकुंभात फ्लिपकार्टने देखील एक दालन उभारले. त्यांनी उद्योजकांना त्यांची उत्पादने आपल्या व्यासपीठारून विनामूल्य विकण्याची संधीही उपलब्ध करून दिली आहे. या फ्लिपकार्टच्या दालनावर खरेदीदार आणि भेट देणार्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
महाकुंभात भरवलेल्या प्रदर्शनात काशी (वाराणसी) इथल्या कारागिरांनी लाकडी खेळणी, बनारसी ब्रोकेड, ओतकाम आणि कोरीवकाम केलेल्या धातूच्या वस्तूंसह अनेक उत्पादने मांडली आहे. या प्रदर्शनात एक जिल्हा एक उत्पादन या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील 75 भौगोलिक सांकेतांकधारीत उत्पादनेही प्रदर्शित केली असून, त्यापैकी 34 उत्पादने काशी क्षेत्रातीलच आहेत, अशी माहिती भौगोलिक संकेततज्ज्ञ डॉ. रजनीकांत यांनी दिली.