फ्लॅट आणि आलिशान वाहनाचे आमिष
पुणे – महसूल विभागातील (आयआरएस) अधिकारी असल्याचे सांगून स्वस्तात फ्लॅट आणि कार घेऊन देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने कोथरूड परिसरातील एकाला 12 लाखाला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत योगेश वाल्हे (42, भाऊ पाटील रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हे यांचे पौड रस्त्यावरील मंगलम चेंबर्स येथे ऍक्युपंक्चर क्लिनिक आहे. मे 2019 मध्य वाल्हे यांच्या क्लिनिकमध्ये आरोपी आला होता. यावेळी आपण आयआरएस अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. बनावट ओळखपत्र दाखवत विश्वास बसण्यासाठी खासगी वाहनास शासकीय पिवळा दिवा लावला होता. यानंतर “तेलंगणा येथे सरकारी वाहनांचे लिलाव होणार असून यामध्ये तुम्हाला फॉर्च्युनर गाडी घेऊन देतो,’ असे वाल्हे यांना सांगितले.
तसेच, खराडी येथे कमी किमतीत फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून वाल्हे यांच्याकडून 12 लाख 6 हजार रुपये रक्कम उकळली. मात्र, त्यांना गाडी व फ्लॅटचा व्यवहार करून न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. ए. यादव करीत आहेत.