बगदाद – उत्र इराकमध्ये इस्लामिक स्टेटने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 12 जण ठार झाले आहेत. किरकुक या प्रशासकीय भागामध्ये हा हल्ला करण्यात आला. एका स्थानिक वृत्तसंस्थेने सुरक्षा सूत्रांच्या आधारे हे वृत्त दिले आहे. इस्लामिक स्टेटने या भागातील ताल ए स्टेल या गावातल्या प्रांतीय पोलिसांच्या दुसऱ्या रेजिमेंटच्या 19 व्या ब्रिगेडवर हा हल्ला केला. इस्लामिक स्टेटच्या या हल्ल्यात तीन अधिकारीदेखील जखमी झाले आहेत.
इस्लामिक स्टेटविरोधात अमेरिकेने कारवाई थाबवलेली नाही. मात्र, आता इस्लामिक स्टेटविरोधातील कारवाई दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांनी 29 ऑगस्ट रोजी इराकचे अध्यक्ष बरहाम सालिह यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले होते.
सध्या इराकमध्ये अमेरिकेचे 2,500 सैनिक आहेत. इस्लामिक स्टेटविरोधात स्थानिक सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये हे दल साह्य करत आहे. अफगाणिस्तानप्रमाणेच इराकमधील दहशतवादविरोध मोहीम या वर्षअखेरीपर्यंत संपुष्टात येईल. डिसेंबरनंतर अमेरिकेच्या सैन्याकडून इराक फौजांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात येईल. इस्लामिक स्टेट विरोधातील कारवाईसाठी इराकी फौजांना या प्रशिक्षणाचा उपयोग होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बोयडेन यांनी म्हटले आहे.