लंडन – व्हिसा नियमांचे उल्लंघन करून गादी आणि केकच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या १२ भारतीय नागरिकांना ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यामुळे फॅक्टरीचे मालकही अडचणीत आले असून त्यांनाही मोठा दंड केला जाण्याची शक्यता आहे. (12 Indians arrested in Britain for violating visa rules)
आपल्या कारखान्यात कोणत्या कामगाराला कामावर ठेवायचे असेल तर त्याच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे कारखानदारांसाठी बंधनकारक आहे. जर तसे न करता बेकायदेशीरपणे कामगारांना कामावर ठेवले गेले असेल तर संबंधित कारखानदारही ब्रिटनच्या कायद्यांनुसार मोठ्या अडचणीत येतात. अधिकाऱ्यांनी वेस्ट मिडलँड्स भागात एका गादी कारखान्यावर व त्याच्याशी संबंधित आणखी एका ठिकाणावर छापा टाकला होता. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळी तेथे बेकायदेशीरपणे काम करत असलेल्या सात भारतीय कामगारांना अटक करण्यात आली. तेथूनच जवळ असलेल्या एका केकच्या फॅक्टरीत कार्यरत असलेल्या आणखी चार भारतीयांना आणि आणखी एका भारतीय महिलेला अटक करण्यात आली आहे. यातील आठ जणांना नियमित हजेरी लावण्याच्या बोलीवर जामीन देण्यात आला आहे तर उर्वरित चार जणांना ब्रिटनमधून बाहेर पाठवण्याबाबत विचार सुरू आहे. सध्या त्यांना कोठडीत ठेवण्यात आले आहे.