वेल्हे (प्रतिनिधी) : वेल्ह्यातील कोवीड केअर सेंटरमधील १२ तर कोळवडीतील ४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अंबादास देवकर यांनी दिली.
कोविड सेंटरमधील एका महिला डॉक्टरला करोनाची लागण झाली होती.संबंधित डॉक्टर महिलेच्या संपर्कातील १२ कर्मचाऱ्यांची करोना टेस्ट केली असता ते सगळे जण निगेटिव्ह आले.तर कोळवडी येथील करोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात ४ व्यक्ती आल्या होत्या त्या चौघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
या सोळा जणांचे तपासणी अहवाल रात्री उशीरा शुक्रवार (दि.१०) रोजी निगेटिव्ह आले. कोवीड केअर सेंटरमधीलच डॉक्टरलाच लागण झाल्याने तालुका प्रशासनसह वेल्हेकर मोठ्या चिंतेत पडले होते. लागण झालेल्या संबंधितांच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुका प्रशासनासह वेल्हेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेल्हे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३८ वर पोहचली असून, त्यापैकी ३५ जणांनी कोरोनावर मात केली असून साखर गावातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.