शिरूर (प्रतिनिधी) – वाघोली (ता. हवेली) येथील भाजीपाला व्यापारी करोना “पॉझिटिव्ह’ असून त्याने अण्णापू (ता. शिरूर) येथे भाजीपाला खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अण्णापूर येथील 12 शेतकऱ्यांवर आरोग्य खात्याची नजर असून या 12 शेतकऱ्यांना “होम क्वारंटाइन’ केले असल्याचे शिरूर प्राथमिक रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
सध्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर तर हवेली तालुक्यातील वाघोली, लोणीकंद या भागात करोना व्हायरसचे रुग्ण सापडले असून येथील गावे सील केली आहेत.
शनिवारी (दि.25) रात्री पासून शिरूर शहर, अण्णापू गाव व पंचक्रोशीमध्ये अण्णापूर येथे काहीतरी झाले असल्याची चर्चा सुरू होती; परंतु रविवारी (दि. 26) वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, वाघोली येथील भाजीपाला व्यापारी हा करोनाबाधित असून त्याच्या हिस्टरीमध्ये त्याने अण्णापूर येथूनही भाजीपाला विकत घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे अण्णापूर गावात भाजीपाला विकणारे 12 शेतकऱ्यांच्याशी संपर्क झाला असून त्यांच्यावर आरोग्य खात्याने लक्ष ठेवून आहेत. तर शिक्रापूर येथील बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा सासरा ससून रुग्णालयातून पळून गेला असून त्याचा तपास सुरू आहे. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, शिक्रापूर पोलिसांनी त्याच्या घरी संपर्क साधून त्याची लवकरात लवकर माहिती देण्याचे सांगितले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.