प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीती कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्या दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि.12) जाहीर करण्यात येणार आहे.
पहिल्या फेरीत सोयीचे व नामांकित महाविद्यालयात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या दुसऱ्या फेरीद्वारे प्रवेश मिळविण्यासाठी आग्रही आहेत. दि. 7 ऑगस्टपासून दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 ते 11 ऑगस्ट रोजी डेटा प्रोसेसिंगची प्रक्रिया पूर्ण करुन पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. 12 ऑगस्टला विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जाहीर झालेले महाविद्यालयात समजणार आहे. कट-ऑफही दर्शविण्यात येणार आहे. संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉग-इनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
दरम्यान, दि. 12 ते 17 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांचे संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे, प्रवेश नाकारणे आदी कार्यवाही करता येणार आहे. 17 ऑगस्ट रोजी प्रवेशाच्या रिक्त जागा पुढील फेरीसाठी समर्पित करण्यात येणार असून 18 ऑगस्ट रोजी पुढील प्रवेश फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार आहे.