111 बालकांवर अत्याचार

शर्मिला पवार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते सप्टेंबर 2018 या नऊ महिन्यांच्या कालावधीत 111 बालकांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यानुसार सरासरी दिवसाला दोन लहान मुलांवर अत्याचार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंजवडी येथील शिक्षकाने केलेला 12 वर्षीय मुलीचा विनयभंग असेल, कासारसाई येथील मुलीचा अत्याचारात झालेला मृत्यू असेल या केवळ प्रतिकात्मक घटना आहेत. ज्यामुळे बाल लैंगिक अत्याचार कशा स्वरुपात घडत आहेत हे समोर येत आहे. यानुसार परिमंडळ एकमध्ये नऊ महिन्यांत 59 बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तर परिमंडळ दोनमध्ये नऊ महिन्यात 57 घटना बाल लैंगिक अत्याचाराच्या घडल्या आहेत. या केवळ दाखल झालेल्या घटना आहेत. या व्यतिरीक्त अशा किती तरी घटना आहेत ज्या दाखल झालेल्या नाहीत. याची मुख्य कारणे म्हणजे मुळात मुलांना लक्षात येत नाही की, आपल्या सोबत काय गैरप्रकार झाला आहे, दुसरे पालकांनाही याबाबत जाण नसते किंवा पालक बदनामीला घाबरतात, तसेच शक्‍यतो या घटना मजुरांच्या मुलांसोबत जास्त जाल्याचे समोर आले आहे. पोलीस व न्यायालयात फेऱ्या मारताना मजुरी बुडायला नको, या भितीनेही पोलिसांपर्यंत काही गोष्टी पोहचत नाहीत.

“गुड टच, बॅड टच’ या उपक्रमामुळे एका विद्यार्थिनीला शिक्षकाने विनयभंग केल्याची जाणीव झाली. विशेष म्हणजे शिक्षिकेने पुढाकार घेत या मुलीला पोलिसांपर्यंत पोहचण्यास मदत केली. त्यानंतर नराधम शिक्षकाला अटक झाली. मुलीने हा प्रकार तिच्या आईच्या कानावर आधी घातला होता. मात्र, बदनामीच्या भीतीने आईने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. मात्र, या मुलीच्या धीटपणामुळे तिला न्याय मिळाला. मात्र, मुलांना मोठ्या विश्‍वासाने शाळेत पाठवणाऱ्या पालक वर्गाला या घटनेमुळे मोठा हादरा बसला आहे.

या घटनांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांचे काम असले तरी पालकांनी व समाजातील इतर घटकांनीही अशा गोष्टींना आळ घालणे गरजेचे आहे. असे कृत्य. बऱ्याचवेळा ओळखीचे, नात्यातील किंवा शेजारच्या व्यक्ती करत असतात त्यामुळे आपले मुले जर अशा काही गोष्ट सांगत असतील तर त्यांचे ऐकायला व त्या गोष्टीला गांभीर्याने घेणे गरजेचे झाले आहे. केवळ मुलीच नव्हे तर मुलांनाही वासनेला बळी पडावे लागत आहे. अनेक मुले अनैसर्गिक अत्याचार सहन करत आहेत. शाळांमधूनही “गुड टच-बॅड टच’ सारख्या उपक्रमातून मुलांना त्यांच्यासोबत होणाऱ्या वाईट गोष्टींची जाणवी व्हायला हवी. त्यामुळे हे शिक्षण केवळ पहिली नाही तर केजी पासूनच्या मुलांना द्यायला हवे, अशी अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त होत आहे.

पोलीस ठाण्यात दाखल बाल अत्याचाराचे गुन्हे (जानेवारी ते सप्टेंबर)
पिंपरी – 13
चिंचवड – 4
निगडी – 19
भोसरी – 2
भोसरी एमआयडीसी -8
आळंदी -6
दिघी – 2
चाकण – 5
वाकड – 11
सांगवी – 15
तळेगाव – 5
तळेगाव एमआयडीसी -1
देहुरोड – 12
हिंजवडी – 8

“पॉस्को’ कायदा काय सांगतो?
नोव्हेंबर 2012 पासून बाल लैंगिक अत्याचार कायदा (पॉस्को) अंमलात आणला आहे. यानुसार 18 वर्षाखालील मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार या कलमामध्ये मोडतात. यासाठी स्वतंत्र न्यायालय, तसेच विशेष सरकारी वकीलही नेमला जातो. यानुसार आरोपीला घटनेच्या गांभिर्यानुसार 20 वर्ष सक्त मजुरी, आजीवन कारावास किंवा नव्याने कायद्यात दुरुस्ती केली असून 12 ते 16 वर्षीय मुलीवर जर सामुहिक बलात्कार झाला असेल तर आरोपीला फाशीची शिक्षा देखील होऊ शकते.

बऱ्याच वेळा मुलांना कळतच नाही की त्यांच्या सोबत काय झाले आहे. त्यामुळे अशा घटना समोर येत नाहीत. कासारसाई प्रकरणातही पीडित मुलीला मी स्वतः बोलले तेव्हा तिला तिच्यासोबत नेमके काय झाले याची कल्पना नव्हती. त्यातच तिचे पालकही अशिक्षीत आहेत. हिंजवडीत शिक्षकाने केलेल्या विनयभंग प्रकरणातही मुलीला तिच्यासोबत झालेल्या गैरप्रकाराची जाणीव ही “गुड टच व बॅड टच’ कळाल्यानंतर झाली. अज्ञानातून कित्येक गुन्हे दाखल नाही होत. मात्र पालकांना याची कल्पना येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, पोलीस त्यांना योग्य ती मदत नक्की करतील.
– नम्रता पाटील, पोलीस उपायुक्‍त, परिमंडळ दोन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)