Satara : जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात 110 कोटींची वाढ; 375 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाबळेश्वर, सातारा सैनिक स्कूलच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार

सातारा – सातारा जिल्ह्याच्या 2021-22 या वर्षाच्या मूळ 264 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यात 110.50 कोटी रुपयांची वाढ करून 375 कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. सातारा सैनिक स्कूलचा नावलौकिक देशात वाढावा यासाठी इमारती व इतर कामांसाठी वेगळ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सहकार, पणन व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अर्थ व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ना. पवार म्हणाले, वन विभागाने जिल्ह्यात उत्तम काम करावे. वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले आहे. हे वृक्ष जगविण्यासाठी मनरेगाचा निधी वापरावा.

स्मशानभूमीतील पत्र्यांची शेड कायमस्वरूपी रहावीत, यासाठी क्रॉंक्रिटचे स्लॅब टाकावेत. साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत दर 15 दिवसांनी वरिष्ठ स्तरावर बैठक घेण्यात येत आहे. कृष्णानगर येथील या महाविद्यालयाच्या जागेवर अतिक्रण होणार नाही, तेथील झाडे तोडली जाणार नाहीत, याकडे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे.

अशी कृत्ये करताना कोणी आढळल्यास कडक कारवाई करावी. पालकमंत्र्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा. पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वरचा विकास, शासकीय विश्रामगृहातील सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल. या बैठकीत आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांनी मुद्दे उपस्थित केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.