रायपूर – बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आहे. ती म्हण छत्तीसगडमधील एका पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी तंतोतंत खरी ठरते आहे. त्या विद्यार्थ्याचे नाव लिवज्योत असून तो छत्तीसगड माध्यमिक शिक्षा मंडळ मध्ये दहावीची परीक्षा देणार आहे.
लिवजोत हा दुर्ग येथील माइल स्टोन स्कूलमध्ये 5 वीच्या वर्गात शिकतो. तो जरी पाचवीच्या वर्गात शिकत असला तरी तो त्याच्या आयक्यूच्या (IQ) जोरावर दहावीची परिक्षा देणार आहे. लिवज्योतचे वडिल गुरविंदर यांनी 15 ऑक्टोबर 2020 रोजी माध्यमिक शिक्षा मंडळचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे अर्ज केला होता. त्यांचा मुलगा लिवज्योतचा आयक्यू 16 वर्षाच्या मुलाएवढा आहे. त्यामुळे त्याला 10 वीच्या परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी असे त्यांनी अर्जात म्हटले होते.
छत्तीसगडमध्ये मुलाचा आयक्यू तपासून त्याला परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येते. त्यामुळे लिवज्योत याचा सरकारी जिल्हा रूग्णालयात आयक्यू तपासून त्याला दहावीच्या परिक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तो 2020-21 ची दहावीची परीक्षा देणार आहे.
लिवज्योतने म्हटले की, त्याने दहावीच्या अभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पुढे वैज्ञानिक बनन्याची त्याची इच्छा आहे. याआधी मणिपूरमध्ये 12 वर्षाच्या तर बिहारमध्ये 9 वर्षाच्या मुलाला 10 वीची परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती.
माध्यमिक शिक्षा मंडळाचे सचिव प्रोफेसर व्हीके गोयल यांनी म्हटले की, पाचवीच्या वर्गात शिकत असलेल्या लिवज्योतचा आयक्यू तपासण्यात आला आहे. त्यानंतर समितीने त्याला पात्र ठरवले असून तो 10वीची परीक्षा देणार आहे.