लोणावळा – लोणावळा शहरात असलेल्या आय. एन. एस. शिवाजी या नौदल प्रशिक्षण केंद्रामधील करोनाबाधित झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या संख्येत मंगळवारी (दि. 23) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी याठिकाणी आणखी चार नव्या प्रशिक्षणार्थी कॅडेट्स तरुणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली असून, मागील चार दिवसांपासून सातत्याने वाढत जाणाऱ्या रुग्णांविषयी शहरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या करोना चाचणी अहवालात आय. एन. एस. शिवाजी नौदल प्रशिक्षण संस्थेमधील चार प्रशिक्षणार्थींचा अहवाल “पॉझिटिव्ह’ आल्याने येथील करोना बधितांची संख्या सात वरून वाढून अकरा झाली आहे.
लोणावळ्यातील आय. एन. एस. शिवाजी नौदल प्रशिक्षण केंद्रात याच महिन्यात काही कॅडेट्स नौदल प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. त्यानंतर या सर्वांना आयएनएस शिवाजी कॅम्पसमध्येच क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र यातील काही तरुणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील वानवडी येथील लष्करी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 20 जून रोजी तीन, 21 जून रोजी एक, 22 जून रोजी तीन तर मंगळवारी 23 जून रोजी चार प्रशिक्षणार्थी कॅडेट्सचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.