Jharkhand Election 2024 – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ११ मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यांचा शपथविधी गुरूवारी होईल. झारखंडमध्ये झामुमोच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने नुकतेच पुन्हा सरकार स्थापन केले.
त्या आघाडीतील इतर घटक पक्षांत कॉंग्रेस, राजद आणि भाकप(एमएल) या पक्षांचा समावेश आहे. झामुमोला सर्वांधिक ५, तर कॉंग्रेसला त्याखालोखाल ४ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
राजद आणि भाकप(एमएल) च्या वाट्याला प्रत्येकी १ मंत्रिपद येणार असल्याचे समजते. मंत्र्यांचा शपथविधी रांचीतील राजभवनात होईल. राज्यपाल संतोषकुमार गंगवार मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
झारखंडमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये बाजी मारून इंडिया आघाडीने त्या राज्याची सत्ता राखली. झारखंडमधील विधानसभेच्या एकूण ८१ पैकी ५६ जागा जिंकत इंडिया आघाडीने दोन-तृतीयांश बहुमत मिळवले.
त्या आघाडीने सोरेन यांना चेहरा बनवून निवडणूक लढवली. त्यामुळे आघाडीने सत्ता राखल्यानंतर सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारली. ते चौथ्यांदा त्या पदावर विराजमान झाले आहेत.