वॉशिंग्टन – अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 11 भारतीय विद्यार्थ्यांना तेथील कायदा विभागाने अटक केली आहे. तेथे या कारणावरून एकूण 15 जणांना अटक करण्यात आली त्यातील 11 भारतीय आहेत. अमेरिकेतील विविध ठिकाणी कारवाई करून या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.
अन्य चार जणांमध्ये दोन लिबियाचे, एक सेनेगलचा तर एक बांगलादेशचा आहे. अमेरिकेतील विदेशी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग अंतर्गत काही सुविधा देण्यात आल्या आहेत, त्याचा गैरवापर करून हे विद्यार्थी अमेरिकेत विनापरवाना राहात होते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत आपण कंपनीत कामाला असल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला होता, पण या कंपन्या अस्तित्वातच नसल्याची बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. स्टुडंट व्हिसा सिस्टीमचा गैरफायदा घेणाऱ्यांवर तेथील अधिकाऱ्यांनी आता आपले लक्ष केंद्रित केले आहे.