मध्यवर्ती शहरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी कारवाई सुरू
पुणे – मध्यवर्ती शहरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी ठरवलेल्या 11 एक्स्प्रेस रस्त्यांवर बसणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी ही माहिती दिली.
शहराच्या मध्यवर्ती भागातील मंदावलेली वाहतूक गतिमान करण्यासाठी प्रमुख 11 रस्ते एक्सप्रेस रस्ते म्हणून घोषित केले आहेत. यासाठी या रस्त्यांवरील पार्किंगचे प्रमाण कमी करण्याबरोबरच रस्त्याच्या कडेला बसणारे पथारी व्यावसायिक, तसेच दुकानांच्या समोर टाकण्यात येणाऱ्या लोखंडी जाळ्या आणि लाकडी “फूटरेस्ट’वर कारवाई करण्याला प्रारंभ केला असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
महापालिका आणि पोलिसांच्या समन्वयाने शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी मागील वर्षभरापासून दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठका होत आहेत. यामध्ये मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे, यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात वाढ होते. प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला असलेले पार्किंग, पदपथ आणि रस्त्यांवरील विक्रेते, दुकानदारांकडून दुकानांसमोर रस्त्यावर ठेवण्यात येणाऱ्या वस्तू आणि साहित्यामुळे पादचारी रस्त्यावर येतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. या निष्कर्षावरून वाहतुकीला गती देण्यासाठी संयुक्तरित्या मोहीम हाती घेतली आहे.
पुन्हा अतिक्रमण झाल्यास कडक कारवाई
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला शिवाजी आणि बाजीराव रस्ता, सातारा रस्ता, फर्गसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता, सोलापूर रस्ता, सिंहगड रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, नगररस्ता, राजभवनकडून खडकीकडे जाणारा अंतर्गत रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. गुरुवारपासून या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. तसेच या रस्त्यांवर असलेली पार्किंगची व्यवस्था काही भाग वगळून कमी करण्यास प्रारंभ केला आहे. या रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्यांतील पोलीसही मॉनिटरिंग करणार आहेत. पुन्हा अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जगताप यांनी दिला आहे.