नवी दिल्ली – हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून चार मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेकांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात कालव्यात बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी सोनीपत जिल्ह्यात मूर्ती विसर्जनाच्या वेळी यमुना नदीत दोन तरुण वाहून गेले. यूपीच्या उन्नाव आणि संत कबीर नगरमध्ये 7 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
महेंद्रगडमधील घटनेबाबत सिव्हिल सर्जन डॉ अशोक कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, चार जणांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रगडमध्ये सात फुटांची मूर्ती विसर्जनासाठी नेली जात होती. यादरम्यान पाण्याच्या जोरदार प्रवाहात 9 तरुण वाहून गेले. जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची मदत घेऊन बचावकार्य हाती घेतले आहे. बचाव मोहिमेदरम्यान चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर इतरांना वाचवण्यात यश आले. बचावलेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.