वॉशिंग्टन- अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतात एका सरकारी इमारतीमध्ये सरकरी कर्मचाऱ्याने केलेल्या बेछुट गोळीबारामध्ये किमान 11 जण ठार झाले आहेत आणि 6 जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारादरम्यान पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हा हल्लेखोरही मारला गेला आहे, असे पोलिस प्रमुख जेम्स सेरवेरा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. जखमींना जवळपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यापैकी किती जण गंभीर जखमी आहेत, याची माहिती मिळू शकली नाही.
ही घटना शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या बंदुकधाऱ्याने शहराच्या पूर्व भागातील व्हर्जिनिया बीच महानगर पालिकेच्या इमारतीमध्ये प्रवेश केला आणि लगेचच बेछुट गोळीबार करायला सुरुवात केली. या गोळीबारात जखमी झालेल्यांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. बुलेटप्रुफ जॅकेट घातलेले असल्याने हा अधिकारी बचावला.
या गोळीबाराविषयी समजताच “एफबीआय’चे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यामध्ये हल्लेखोर मारला गेला.