पालघर – विरारमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरेंना केलेल्या मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याप्रकरणी अटक केलेल्या ११ जणांना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एक ऑटोरिक्षा चालक, स्थानिक ग्रामस्थ आणि रिसॉर्टचे कर्मचारी, यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इतर गुन्ह्यांसह, आरोपींना स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मिलिंद मोरे हे रविवारी आपल्या कुटुंबीयांसह एका रिसॉर्टमध्ये गेले होते आणि संध्याकाळी परतत असताना काही ऑटोरिक्षा चालकांशी वाद झाला आणि त्यानंतर झालेल्या भांडणात ते खाली पडले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे ते पुत्र आहेत. मिलिंद मोरे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 105 नुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर, वसई-विरार महानगरपालिकेने अर्नाळा समुद्रकिनाऱ्याजवळील रिसॉर्टजवळील बेकायदा बांधकामे पाडण्यास सुरुवात केली आहे.