पुणे – बेळगाव येथील मनगुत्ती गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील आंबेगाव, हवेली, शिरूर, मुळशी तालुक्यात शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करीत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या प्रतिमेचे दहन करीत जोरदार घोषणाबाजी केली.
घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथील चौकात शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. कोरेगाव भीमा येथे संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा पुतळा जाळून निषेध केला. मांडवगण फराटा येथे शिवसेनेच्या वतीने निषेध केला. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या नेतृत्त्वाखाली मांडवगण फराटा येथील दूरक्षेत्रात निवेदन देण्यात आले.
मंचर येथे शिवसेनेच्या वतीने येडियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतिमेस चपलांचा हार घालून प्रतिमा जाळून निषेध करण्यात आला.