लोणी काळभोर (वार्ताहर) – राष्ट्रीय रुग्णवाहिका चालक (108) यांना विनाअट सरळ सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत वेळोवेळी सनदशीर मार्गाने गाऱ्हाणे मांडूनही त्याचा विचार करण्यात आला नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय रुणवाहिका चालक कर्मचारी संघटना शुक्रवारी (दि. 3) महाराष्ट्रभर वाहन बंद ठेवून त्या-त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, मागणी मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहेत.
संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष काळूराम सस्ते म्हणाले की, राज्य-केंद्र पातळीवर सर्व नेते, अधिकाऱ्यांसमोर वेळोवेळी समक्ष भेटून व पत्राद्वारे मागणी मांडण्यात आली; परंतु या प्रश्नावर कोणीच गांभीर्याने विचार न करता आमच्या मागणीस केराची टोपली दाखवली.
दरम्यान, आंदोलन काळात वाहन बंद झाल्याने रुग्णाचे व शासकीय दवाखान्यांचे कसलेही नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा संघटनेचे वतीने देण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. करोनाच्या वाढत्या प्रसाराच्या काळात रुग्णवाहिका चालक संपावर गेल्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.