प्रसाद शेटे
चालकांना आमिष; ठोस उपाययोजनेसाठी प्रशासनाचे हवे लक्ष
मेढा – सध्याच्या परिस्थितीत अनेक खासगी रुग्णालये सेवाभावापेक्षा आर्थिक लाभाच्या हिशोबानेच थाटलेली असतात. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून अवास्तव फी आकारणे व गरजेपेक्षा अधिक महागडी औषधे सांगणे हे पर्यायाने आलेच आहे. आजकाल काही डॉक्टर्स वेगवेगळ्या चाचण्यांसाठी रुग्णांना एकमेकांकडे पाठवत असतात. आता तर खासगी रुग्णालयांनी यात रुग्णवाहिकेच्या चालकांनाही समाविष्ट केले आहे. रुग्णांना शासकीय रुग्णालयात न नेता रुग्णवाहिकेचे चालक कमिशनच्या आमिषापोटी रुग्णाला थेट खासगी रुग्णालयाची पायरी दाखवतात. काही वेळा परवडत नसतानाही रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत, म्हणून खासगी रुग्णालयांत दाखल व्हावे लागते.
अशा वेळी रुग्ण वा त्याच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती लक्षात न घेता अवास्तव फी वा अनामत रक्कम भरायला सांगितले जाते व त्यानंतरच उपचार करणारी काही रुग्णालये आहेत. “108′ च्या या सेवेतून होणारी ही लूट थांबवण्यासाठी ठोस उपाययोजनेसाठी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. सध्या खासगी रुग्णालयांकडून आकारले जाणारी देयके पाहिल्यावर शहाण्याने रुग्णायाची पायरी चढू नये, अशीउक्ती रुग्णालयांनाही लागू करावी की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येते. खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर अनपेक्षित येणारे भरमसाठ बिल, गरज नसताना होणाऱ्या अनावश्यक तपासण्या, औषधांचा भडिमार, कधी एखादी शस्त्रक्रिया तर सरकारी रुग्णालयात दिवसेंदिवस अत्याधुनिक सुविधा येत असताना 108 च्या कमिशनबाज चालकांमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
ग्रामीण भागातून मोठ्या रुग्णालयांपर्यत पोहचवण्यामध्ये 108 सुविधेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शासकीय रुग्णालयात पोच करताना रुग्णांची इच्छा नसली तरी अनेक शासकीय रुग्णालयात या सुविधा भेटत नाहीत. अमुक तमुक हॉस्पिटल यावर चांगले उपचार करते, अशा भूलथापा रुग्णांच्या मनात बिंबवून गाडी खासगी रुग्णालयांत वळवली जाते. अशा किती तरी घटना उघडकीस आल्या असून रुग्णांना खासगी दवाखाना दाखवणाऱ्या ऍम्बुलन्सच्या चालकांवर प्रशासनाने वचक ठेवायला पाहिजे.