करोनाशी लढण्यासाठी 104 वर्षीय आजीबाईंचा द्विअक्षरी मंत्र
रोम (इटली) : घाबरताय कसलं… खचू नका आणि विश्वास ठेवा… धीर आणि विश्वास हे दोन शब्दच मला गेली 104 वर्ष ठणठणीत ठेवत आहेत… करोनाच्या लढाईत धीर आणि विश्वास हा दोन अक्षरी मंत्र जगाला बहाल केलाय एका 104 वर्षांच्या आजीबाईंनी…
इटली आणि स्पेन हे तसे युोरोपमधील लोकसंख्येची घनता अधिक असणारे प्रदेश… सध्या करोनाने या भागात धुमाकूळ घातलाय… अनेक वयोवृध्दांचे प्राण घेतलेत… अशा निराशेने ग्रासलेल्या इटलीसाठी या 104 वर्षांच्या आजींनी प्रेरणा मंत्र दिलाय. आज इटलीत आजींचा हा मंत्र अनेकांना नवसंजिवनी देणारा ठरत आहे.
पिडमॉन्ट या उत्तरेकडच्या भागातील लेस्सॅना शहरात राहणाऱ्या झानुस्सो या आजीबाईंशी असोसिएट प्रेसने संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणल्या, “मी उत्तम आहे… मी ठणठणीत आहे… मी टिव्ही पाहते… वर्तमानपत्र वाचते…’
मास्क घालून बसलेल्या आजीबाईंसोबत त्यांचे फॅमिली डॉक्टर होते. झानुस्सो यांना त्यांच्या आजाराबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मला काहीसा ताप येतोय… त्यांचे डॉक्टर म्हणाले, त्या काही आठवडे झोपून होत्या. त्या काही खात नव्हत्या त्यामुळे त्यांना आम्ही आधी हायड्रेट केले. त्या नेहमीच प्रतिसाद देत नसत. पण एक दिवस त्यांनी डोळे उघडले. आणि आधी करत त्या सर्व गोष्टी करायला सुरवात केली. हळहळू त्या उठून बसल्या. त्यातून त्यांनी आंथरूण सोडले.
या आजारातून कशा बाहेर आल्या ,असे विचारता झानुस्सो म्हणाल्या, धैर्य आणि विश्वासाची ताकद.. या दोन गोष्टीमुळेच मी आजारपणातून बाहेर पडले. त्यामुळे आजारी पडलेल्या सर्वांना माझे हेच सांगणे आहे, धीर ठेवून आजाराला सामोरे जा. विश्वास ठेवा…
सध्या लॉकडाऊनमुळे घरातच राहणे क्रमप्राप्त आहे. पण दार उघडल्यावर मला मस्त भटकायला आवडेल… आणि तुमचे तीन पणतू? असे म्हणताच आजीबाई म्हणाल्या, ते खेळत बसतील… सध्या त्या क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यांना सध्या करोनाची लक्षणे दिसत नाहीत. मात्र त्यांच्या स्वॅबचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.