मुंबई – राज्यात करोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या 103 झाली आहे. यात 60 शासकीय, तर 43 खासगी प्रयोगशाळा आहेत. तसेच प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात करोनाचा पाहिला रुग्ण दि. 9 मार्च रोजी आढळून आला. त्यावेळेस मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर करोना चाचण्यांच्या सुविधेत दिवसेंदिवस वाढ केल्याने ही संख्या आता 103 वर पोहोचली आहे. राज्याचे प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण 5847 एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण 4610 एवढे आहे.
देशात सर्वाधिक चाचण्या राज्यात होत आहे. गेल्या तीन महिन्यांत सातत्याने चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली. कालपर्यंत 7,73,865 एवढे नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी 1,32,075 एवढे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांचे प्रमाणे हे 17 टक्के आढळून आले आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.