पुणे – आरामखुर्चीत बसलेल्या अवस्थेतील लोकमान्य टिळकांचा पुतळा शुक्रवारी केसरीवाड्यातील त्यांच्या निवासस्थानी स्थापित करण्यात आला. मुुंबईतील सरदार भवनात मूर्तिकार केशव लेले यांनी 102 वर्षापूर्वी म्हणजेच 1919 मध्ये लोकमान्य टिळकांसमोर बसून हा पुतळा तयार केला आहे. खरे कपडे आणि हातात वर्तमानपत्र असल्याने हा पुतळा जिवंत भासतो.
केसरीवाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मुक्ता टिळक, शैलेश टिळक, शिल्पकार केशव लेले यांचे चिरंजीव यशवंतराव लेले, त्यांची कन्या डॉ. चित्रा लेले, शिल्पकार अभिजित धोंडफळे, कुणाल टिळक आणि चैत्राली टिळक आदी उपस्थित होते.
केशव बाबुराव लेले यांनी वयाच्या 18व्या वर्षी मुंबईतील सरदार भवन येथे लोकमान्य टिळकांना समोर आराम खुर्चीमध्ये बसवून हा पुतळा साकारला आहे. त्यानंतर पुढील 80 वर्षे तो दादर येथे लेले कुटुंबियांच्या निवासस्थानी होता. त्यानंतर 1999 मध्ये पुण्यातील महात्मा सोसायटी येथे वास्तव्य करणारी त्यांची नात डॉ. चित्रा लेले यांच्या घरी पुतळा हलविण्यात आला होता. तो चांगल्या ठिकाणी ठेवण्यात यावा, अशी लेले कुटुंबियांची इच्छा होती.
लोकमान्यांचे निवासस्थान असलेल्या वास्तुचे नूतनीकरण झाल्यानंतर हा पुतळा स्थापित करू, असे त्यांना सांगितले होते. गुरूपौर्णिमा आणि टिळक जयंतीच्या दिवशी पुर्णाकृती पुतळा स्थापित केला आहे, आपण लेले कुटुंबियांचे ऋणी असल्याचे शैलेश टिळक यांनी सांगितले.
वडिलांच्या निधनानंतर लोकमान्य टिळकांचा पुतळा माझ्याकडे होता. तो आम्ही जपला. माझ्यानंतर तो चांगल्या जागेत सुरक्षित असावा, अशी इच्छा असून तो येथे व्यवस्थित राहील, अशी भावना लेले यांनी व्यक्त केली.
शंभर वर्षे झाल्याने पुतळ्याची स्थिती नाजूक झाली होती. रंगाचे थर जमा झाले होते, मुळ पुतळ्याला धक्का न लागता ते काढावे लागले. हे काम करायला मिळाले, हे मी भाग्य समजतो. नुतनीकरणास एक महिना लागला. जशास तसे काम व्हायला पाहिजे, अशी लेले काकांची इच्छा होती. त्यामुळे मनात धाकधुक होती. विशेष म्हणजे त्वचेचा गव्हाळ रंग देणे. मी केलेले काम काकांच्या पसंतीस उतरले ही माझ्यासाठी महत्त्वाची दाद आहे, असे पुतळ्याचे नुतनीकरण करणारे शिल्पकार धोंडफळे म्हणाले.