शहरात 102 “ई-पीयूसी’ केंद्र ऑनलाइन

‘परिवहन’च्या संकेतस्थळावर सर्व माहिती घरबसल्या मिळणार

पुणे – वाहन प्रदूषण तपासणीसाठी असणारी “पीयूसी’ अर्थात “पोल्युशन अंडर कंट्रोल’ तपासणी यंत्रणा अद्ययावत झाली आहे. सध्या शहरामध्ये 102 “ई-पीयूसी’ केंद्र सुरू झाली असून, त्यांची माहिती वाहनमालकांना “ऑनलाइन’ पाहता येणार आहे.

शहरांतील वाहनांची संख्या 40 लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे प्रदूषण पातळीदेखील वाढत आहे. त्यामुळे वाहनांची “पीयूसी’ आवश्‍यक आहे. मात्र, सध्याच्या वाहनसंख्येच्या तुलनेत असणारी “ई-पीयूसी’ केंद्रांची संख्या तुलनेने कमी आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व पीयुसी केंद्रे अद्ययावत करण्यात येत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने याबाबत सूचना दिल्या होत्या.

दि. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, याविरोधात केंद्रचालक न्यायालयात गेल्याने काही महिने हा निर्णय प्रलंबित होता. परंतु, न्यायालयाने केंद्रचालकांच्या मागण्या अमान्य केल्या होत्या. शहरांतील ई-पीयूसी केंद्रांची माहिती परिवहन विभागाच्या “परिवहन’ या संकेतस्थळावर “अपडेट’ करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या जवळपासच्या परिसरांतील केंद्रांची माहिती घरबसल्या समजणार आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी या प्रवर्गांचा समावेश आहे. या संकेतस्थळावर केंद्राचे नाव, पत्ता, वाहनाचा वर्ग, मोबाइल क्रमांक, इ-मेल आयडी पाहता येणार आहे.

प्रदूषणाची पातळी नियंत्रित आहे की नाही, यासाठी पीयूसी तपासणी केली जाते. या चाचणीमुळे कार्बन मोनॉक्‍साईड आणि हायड्रोकार्बनचे प्रमाण तपासले जाते. या पूर्वी ही प्रक्रिया मॅन्यूअली करण्यात येत होती. मात्र, ही यंत्रणा ऑनलाइन झाल्याने गैरप्रकाराला आळा बसणार आहे.

शहरात सुमारे 350 पीयूसी केंद्र होती. त्यापैकी 102 केंद्र ऑनलाइन झाली आहेत. तर अन्य जुन्या केंद्रचालकांनी उत्पादकांकडे अद्ययावत पीयूसी मशिनची मागणी केली आहे. त्यामुळे “ई-पीयूसी’ केंद्रांसाठी प्रयत्न होत आहेत. “मॅन्युअली’ दिले जाणारे प्रमाणपत्र यापुढील काळात अवैध ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी “मॅन्युअल’ प्रमाणपत्र स्वीकारू नये.
– विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)