79 हजार ग्राहक : नऊ महिन्यांपासून रुपयादेखील भरला नाही
पिंपरी – लॉकडाऊननंतर आजतागायत पिंपरी-चिंचवड शहरातील 79 हजार 115 वीजग्राहकांकडून एक रुपयाचेदेखील बिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे बिलापोटी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरातील वीजग्राहकांकडून तब्बल 102 कोटी रुपये येणे बाकी आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने केंद्र सरकारने 23 मार्चपासून लॉकडाऊन केले. त्यामुळे देशभरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे व व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळोवेळी लॉकडाऊन कालावधीत वाढ करण्यात आली. उद्योगनगरीचा गाभा असलेल्या उद्योगांचे चाक सप्टेंबर महिन्यापर्यंत जागचे हलले नाही. या कालावधीत उद्योगनगरीतील उद्योगांमध्ये कामगार कपात, वेतन कपात अशा विविध बाबींचा अवलंब करण्यात आला.
दरम्यान, या कालावधीत महावितरणकडून अत्यावश्यक सेवेंतर्गत वीजपुरवठा सुरू असताना, लॉकडाऊनच्या काळातील निर्बंधांमुळे मीटर रीडिंगकरिता बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना बाहेर फिरता आले नाही. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीज बिले देण्यात आली. बहुतांशी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने बिले प्राप्त करत, ती भरलीदेखील. मात्र, अव्वाच्यासव्वा रकमेच्या बिलांना आक्षेप घेत, उत्पन्नाचे साधनच नसल्याने या कालावधीतील वीज बिले माफ करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यानुसार एका मंत्र्याने वीज बिलमाफीची घोषणा केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
मात्र, काही दिवसांतच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल माफी शक्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच थकीत बिले दुरुस्त करून देत, टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा दिल्याने बहुतांशी ग्राहकांनी थकीत बिले जमा केली आहेत. मात्र, अद्यापही शहरातील 79 हजार 115 वीज ग्राहकांकडून 102 कोटींची वीज बिले येणे बाकी आहेत. या ग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे, अशी विनंती महावितरणकडून थकबाकीदारांशी थेट संपर्क व संवाद साधून करण्यात येत आहे.
वीज बिल माफीच्या अपेक्षेने बिले थकीत
लॉकडाऊनमध्ये हक्काचा रोजगार हिरावल्याने मध्यम व सर्वसामान्य कुटुंबांची मोठी आर्थिक कोंडी झाली. या कालावधीतील वीज बिले माफ करण्याच्या शक्यतेने अनेकांना दिलासा मिळाला. मात्र बिल माफ होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या ग्राहकांकडून वीज बिल भरणा करण्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही.