मेक्सिको – ट्रम्प यांनी मेक्सिकोवर वाढीव आयात शुल्क लादण्याची धमकी दिल्यानंतर मेक्सिकोकडून अमेरिका-मेक्सिको सीमेवर १० हजार सैनिक तैनात केले जाणार आहेत. सिउदाद जुआरेझ आणि अल-पासो, टेक्सासला वेगळे करणाऱ्या सीमेवर हे सैनिक तैनात केले जाणार आहेत.
या सैनिकांनी सीमेवरील कुंपणाला लावलेल्या शिड्या आणि दोऱ्या कापून टाकल्या आहेत. तसेच सीमेवरील कुंपणाची भिंत ओलांडण्यासाठी उभारलेल्या छोट्या ढाच्यांनाही ट्रकने हटवण्यात आले आहे. तिजुआनवा भागातील सीमा भागात सैनिकांकरवी गस्त देखील घातली जाऊ लागल्याचे आढळून आले आहे.
मेक्सिकोतून अमेरिकेत होणारी घुसखोरी हा दोन्ही देशातील वादाचा मुद्दा बनला होता. ट्रम्प यांनी मेक्सिकोतून आयात होणाऱ्या उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा आपल्या आदेशांची अंमलबजावणी अलिकडेच महिन्याबरासाठी स्थगित केली आहे.
अमेरिका-मेक्सिकोचा सीमेवर नॅसनल गार्ड तैनात केले जातील आणि फेंटॅमाईलची होणारी तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे आश्वासन मेक्सिकोच्या अध्यक्षा क्डिया शेनबॉम यांनी ट्रम्प यांना दिले आहे.
दुसरीकडे ट्रम्प यांनीही अमेरिकेतून मेक्सिकोमध्ये शस्त्रांची तस्करी होऊ न देण्यासाठी उपाययोजना करण्याचे निश्चित केले आहे. यामुळे ड्रग्जशी संबंधित टोळ्यांमधील टोळी युद्ध रोखण्यास मदत होईल, असा अंदाज आहे. अमेरिकेबरोबरच्या तडजोडीचा भाग म्हणून मेक्सिकोच्या सैन्याची पहिली तुकडी सीमावर्ती शहरांमध्ये मंगळवारी दाखल झाली. सरकारी आकडेवारीनुसार किमान १६५० सैनिक सिउदाद जुआरेझला पाठवले जाण्याची अपेक्षा होती.