पुणे – महामार्गांसह शहरातील रस्ते अपघातांची आकडेवारी चिंताजनक ठरत आहे. शहर परिसरात जानेवारी ते मार्च या गेल्या तीन महिन्यांत 96 अपघातामध्ये 100 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे.
रस्ते अपघातांत रॅश ड्रायव्हिंग, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक, मानवी चुकांसह अरूंद रस्ते, खड्ड्यांचे प्रमाण अशी कारणे आहेत. शहरातील गंभीर अपघातांमध्ये 164 जण गंभीर जखमी झाल्याचे शहर वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वाहतूक नियोजन आणि बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईसाठी शहर परिसरात वाहतूक पोलिसांचे 20 विभाग कार्यरत आहेत.
या प्रत्येक विभागाकडून आपल्या हद्दीमध्ये वाहतूक सुरक्षेसाठी जनजागृती, नियमभंग करणाऱ्या दंडात्मक कारवाई, रस्त्यावरील आवश्यक उपाययोजना सुचविण्याचे काम केले जाते. मात्र, असे असले तरी काही भागात विशेषतः शहरात नव्याने समावेश झालेल्या लोणी काळभोर आणि लोणीकंद भागात अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे.
या दोन्ही भागात तीन महिन्यात 29 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोणी काळभोर भागातून जाणारा सोलापूर रस्ता आणि लोणीकंद भागातून जाणाऱ्या पुणे – नगर रस्त्यावर सर्वाधिक अपघाती मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
रस्ता क्रॉस करताना पादचाऱ्याचा मृत्यू, रात्रीच्या वेळी झालेले अपघात, भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू अशा घटना सर्वाधिक आहेत. या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून प्राधान्याने उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. तसेच, शहर परिसरात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
अपघाताची आकडेवारी दृष्टीक्षेपात
– प्राणांतिक अपघाताची संख्या – 96
– अपघाती मृत्यू – 100
– गंभीर अपघातांची संख्या – 148
– अपघातात गंभीर जखमी – 164