हेरात (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तान-इराणच्या सीमेजवळ तेलवाहू टॅंकरमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये तेलाचे 100 टॅंकर जळून भस्मसात झाले. तेलाच्या एका टॅंकरला लागलेल्या आगीमुळे झालेल्या प्रचंड स्फोटात एकापाठोपाठ एक करत 100 टॅंकरनी पेट घेतला आणि हे सर्व टॅंकर जळून भस्मसात झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास अफगाणिस्तान- इराणच्या सीमेवरील इस्लाम काला कस्टम पोस्टच्या जवळ घडली, असे अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कस्टम पोस्टच्या परिसरामध्ये अत्यंत दाटीवाटीने हे तेलाचे टॅंकर उभे करण्यात आले होते. त्यामुळे आग झपाट्याने पसरली. शनिवारी संध्याकाळपर्यंत आग आटोक्यात येऊ शकलेली नव्हती. अखेर तब्बल 100 टॅंकर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र या टॅंकरपैकी पहिल्या टॅंकरने कशामुळे पेट घेतला हे समजू शकलेले नाही.
या आगीमध्ये 500 टॅंकर जळून गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि ही आग इराणच्या कस्टम पोस्टपर्यंत पसरली होती, असेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र हेरात प्रांतातील अधिकाऱ्यांकडून त्याचे अधिकृतपणे स्पष्टिकरण मिळू शकले नाही.
या आगीमध्ये किमान 17 जण जखमी झाले आहेत. जखमींची संख्या आणखीन वाढण्याची भीती प्रांतिय आरोग्य विभागाचे प्रवक्ते मोहंम्मद रफिक शेरझाय यांनी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानमध्ये तेल पुरवठा करणाऱ्या हनिफ मेरवान कंपनीचे 21 टॅंकर या आगीमध्ये संपूर्ण नष्ट झाले, असे कंपनीचे मालक अहमद तारिक सालेह यांनी सांगितले. या टॅंकरमधून इराणमधून तेल आणि नैसर्गिक वायू आयात केला जात असे. मात्र अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या अफगाणिस्तानच्या सैन्य दलांना हे तेल वापरण्याची परवानगी नाही.
इराणमधून अफगाणिस्तानला मोठ्या प्रमाणावर तेलाची निर्यात केली जाते. या निर्यातीच्या शुल्कातूनच हेरात प्रांत आणि पश्चिम अफगाणिस्तानला मोठा महसूल मिळत असतो. या भागातून होणारी तेलाची वाहतुक दीर्घकाळापासून बंद होती. यामुळे अफगाणिस्तानच्या मोठ्या भूभागाला होणारा तेलाचा पुरवठा कमी झाला होता. आताही तेलाच्या टॅंकरला लागलेल्या आगीमुळे अफगाणिस्तानात तेलाची टंचाई निर्माण होऊ शकते. आग भडकल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव इराणमधून होणारा वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण हेरात शहर अंधारात गेले होते.