शंभर उपक्रमशील शाळांचा 50 देशांतील भारतीयांशी संवाद

नगर जिल्हा परिषद व ग्लोबल नगरी इंटरनॅशनल यांचा हायटेक उपक्रम 

नगर  – सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध देशांतील शिक्षण पद्धती तसेच शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम यांची माहीती मिळावी आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी मुळचे नगर जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेले सध्या जगातील विविध 50 देशांमधे कार्यरत यशस्वी भारतीय आणि जिल्हा परिषद नगर यांच्या समन्वयातुन ग्लोबल नगरी विडियो कॉन्फरन्स उपक्रम दिनांक 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील 100 शाळांत राबविण्यात येणार आहे.

हे या उपक्रमाचे तिसरे वर्ष असून मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. यामधे मुळचे नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकलेले व सध्या विदेशात विविध महत्वाच्या पदांवर कार्यरत असलेले यशस्वी भारतीय यांच्या ग्लोबल नगरी या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातुन नगर जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थी विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्षभर संपर्कात राहून त्या शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न करणे.

तसेच या शाळांमधे आंतरराष्टीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील रहाणे हा या उपक्रमचा मूळ हेतु आहे. यामधे प्रत्येक शाळेसाठी एक विदेशी नगरी भूमिपुत्राची मेंटर म्हणून निवड केली जाते. हे मेंटर वर्षभर शाळेच्या संपर्कात राहून शाळेस येणाऱ्या अडचणी , वर्षभरातील विविध उपक्रम, तसेच शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर व्हर्चुयल माध्यमांतून कार्यरत राहतात.
मुळचे श्रीरामपुर येथील रहिवाशी व सध्या अमेरिका स्थित डॉ. किशोर गोरे यांनी या सर्व नगर जिल्ह्यातील भूमिपुत्रांना ग्लोबल नगरी समुहाच्या माध्यमातून एकत्र आणले असून सर्व जण जिल्हा परिषद शाळेत शिकलेले असल्याने या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे सर्वजण परदेशात स्थायिक असून सुद्धा मुलांचे प्रारंभिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले जावे हे त्यांचे ठाम मत आहे.

त्यासाठीच ते प्रयत्नशील आहेत. यावर्षी नगर जिल्ह्यातील एकूण 100 शाळांसाठी तितकेच मेंटर निवडलेले आहेत. वर्षभरात राबवायचे उपक्रम , शाळेच्या गरजा तसेच विद्यार्थी / पालक यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टीने यंदाची विडियो कॉन्फरन्स ही दिनांक 1 फेब्रुवारी रोजी होत आहे. या वर्षात ग्लोबल नगरी परिवाराद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असून शाळांकडून यासाठी नामांकने मागविण्यात येणार आहेत. हा उपक्रम फ़क्त नगर जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.