- कामकाजासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता
पुणे – विद्यापीठाच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात होत आहे. परीक्षेच्या कामकाजासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थेत यापुढे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
करोना पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधील प्रशासकीय कामकाज हे मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होत होते. दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात 6 जुलै रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. परंतु राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयास न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. त्याच कालावधीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करणे आवश्यक आहे. त्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन करणे अशी परीक्षेचे कामकाज राहणार आहे. त्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे कामकाज प्राप्त परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100 टक्के बंधनकारक राहील, असा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध केला.