कोट्टायम – धावत्या रेल्वेतून खाली पडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना केरळमधील कोट्टायम येथील मोलावत्तोम भागात रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. मोहम्मद इशान (वय-10 वर्ष, रा. ममबादू, मल्लपुरम) असे अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इशान त्याच्या कुटुंबासोबत कोचुवेली-निलांबुर राज्य राणी एक्सप्रेसमधून थिरूअनंतपुरम येथून मल्लपुरमला येत होता. यावेळी रात्री त्याला टाॅयलेटला जायचे होते. अधवर्ट झोपेच्या अवस्थेत असलेल्या मोहम्मद इशानने टाॅयलेटचा दरवाजा समजून एक्झिट डोअर उघडले आणि तोल जाऊन रेल्वेतून खाली पडला.
ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेची चेन ओढून रेल्वे थांबवली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोधाशोध सुरु केली. तो जखमी अवस्थेत एका नाल्यात पडल्याचे आढळले. तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.