पुणे – ऑक्सिजन निर्मितीसाठी उद्योग विभागाने प्रस्तावित केलेल्या विशेष प्रोत्साहन योजनेला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास 898 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होईल, असे नवे प्रस्ताव शासनाकडे आले आहेत. यामध्ये पुणे विभागातून दहा प्रस्ताव आले असून, दररोज 199 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत जाणवलेली ऑक्सिजनची कमतरता दूर व्हावी, यासाठी राज्याने “मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना हाती घेतली. या अंतर्गत ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले आहे. आता संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनची उपलब्धता व नियोजन व्हावे, यासाठी हे मिशन राबविण्यात येत आहे. याची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे.
करोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रभावी उपाययोजनांतर्गत ऑक्सिजनची उपलब्धता व व्यवस्थापन याकरिता उद्योग विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. या संदर्भाने मेडिकल ऑक्सिजनची उत्पादनक्षमता आणि गरज यामध्ये जवळपास 600 मेट्रिक टन कमतरता दिसून आली आहे.
राज्यात ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्रस्तावित नवीन तसेच विस्तारीकरण अंतर्गत औद्योगिक प्रकल्पांनी, उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आतापर्यंत 57 प्रस्ताव सादर केले आहेत.
राज्यात 3 हजार मेट्रिक टन प्रति दिन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या राज्यात 1300 मेट्रिक टन प्रति दिन एवढी ऑक्सिजन निर्मिती होत आहे.