नगर – महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी पुणे येथील स्वयंभू या संस्थेची तीन वर्षासाठी नियुक्ती केली आहे. स्वयंभूकडून शहरातील 45 वाहनाद्वारे कचरा संकलन करण्यात येत होते. मात्र, शहरात अनेक भागात कचरा रस्त्यावर पडून असल्याबाबत व कचरा संकलनासाठी वाहने कमी पडत असल्याचे दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत स्वयंभूने आणखी 10 घंटा गाड्या खरेदी करून कचरा संकलन करण्यात येणार आहे.
महापालिकने तीन वर्षासाठी शहर स्वच्छतेचा ठेका पुण्याच्या स्वयंभू या संस्थेला दिला. त्यासाठी महापालिका दररोज टनामागे 1 हजार 650 रुपये प्रमाणे दररोज 2 लाख 14 हजार रुपये मोजते आहे. तीन वर्षाला अंदाजे 23 कोटी 16 लाख 60 रुपये खर्च होणार आहे. हा खर्च दरवर्षी 7 ते 8 कोटी होणार आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील लोकसंख्याप्रमाणे कचऱ्याचे गणित काढले जाते. त्यानुसार प्रति व्यक्ती 300 ग्रॅम असे चार लाख लोकसंख्यासाठी दररोज शहरात 120 ते 140 टन कचरा शहरात साचला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट या खाजगी संस्थेला ठेका देण्यात आला असून सध्या या ट्रान्सपोर्ट कडून 55 वाहनाद्वारे कचरा संकलन करण्यात येते.
स्वयंभूने ही शहरात कचरा संकलन करण्यासाठी 40 घंटागाड्या, 10 कंटेनर, 5 कॉम्पॅक्टरद्वारे कचरा उचलला जात आहे. मात्र, बुरडगाव येथील कचरा डेपो बंद असल्याने सध्या शहरातील सर्वकचरा हा सावेडी येथील कचरा डेपोत टाकावा लागतो. त्यामुळे स्वयंभूकडे वाहने कमी असल्याने अनेक भागात कचरा तसाच राहात असल्याचे तक्रारी होत होत्या. त्यामुळे स्वयंभूने आनखी 10 घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. तसेच प्रत्येक प्रभागासाठी 1 कॉम्पॅक्टर खरेदी करणार आहेत. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या राहणार नसल्याचे स्वयंभूचे भापकर यांनी सांगितले.