सातारा – लंपी स्किनमुळे जिल्ह्यात गुरुवारी 10 जनावरांचा मृत्यू झाला असून आजअखेर 201 गायी, 65 बैल असे 266 पशुधन मृत झाले आहे. महाबळेश्वर वगळता 10 तालुक्यातील 148 गावांमध्ये लंपी स्किनची लागण झाली आहे. आजअखेर 3817 गायी व 482 बैल अशा 4 हजार 299 जनावरांस प्रादुर्भाव झाला आहे. आजअखेर 1483 गाय व 93 बैल अशी 1576 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
लंपी स्किनच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. जिल्हयातील गोवर्गीय पशुधनाची संख्या 3 लाख 52 हजार 436 असून त्यापैकी आजअखेर बाधित गाव व बाधित गावाच्या 5 किलोमीटर परिघातील 782 गावांमधील 1 लाख 96 हजार 186 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमधील 1 लाख 50 हजार 914 असे 3 लाख 47 हजार 100 पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
ऊसतोड कामगारांनी लसीकरणासाठी संपर्क साधावा
जिल्ह्यामध्ये ऊस कारखाना गळीत हंगामासाठी परजिल्ह्यातून ऊस तोडणी कामगार त्यांच्या पशुधनासह कारखानास्थळी स्थलांतरित होत असतात. काही कारखान्यांच्या ठिकाणी ऊस वाहतुकीसाठी बैलगाडींचा वापर केला जातो. अशा ठिकाणी वाहतुकीचे बैल व इतर पशुधन स्थलांतरीत कुटुंबाबरोबर आणले जातात. लंपीचे प्रतिबंध व नियंत्रण होण्यासाठी साखर कारखान्यांच्या ठिकाणी ऊस तोड कामगारांचे कुटुंबासोबत येणाऱ्या पशुधनास लसीकरण झालेले नाही, अशा पशुधनास लसीकरण करुन घेण्यासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.