दावोस – संपूर्ण जगात दर 33 तासांनी 10 लाख लोक गरिबीच्या खाईत जात आहेत. या दराने यावर्षी किमान 26.30 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जाण्याची शक्यता आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रॉफिटिंग फ्रॉम पेन’ या शीर्षकाच्या अहवालात हा दावा केला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मागील दशकांच्या तुलनेत झपाट्याने वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक सुरू आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने आपल्या अहवालात सोमवारी सांगितले की, करोना महामारीच्या काळात जगात दर 30 तासांनी एक नवीन अब्जाधीश उदयास आला आहे. उलट या वर्षी आता दर 33 तासांनी 10 लाख लोक गरिबीच्या खाईत जात आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही सार्वजनिक-खाजगी भागीदारीची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. दावोसमध्ये दोन वर्षांनंतर त्याची बैठक होत आहे.
ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, महामारीच्या काळात दर 30 तासांनी एक नवीन अब्जाधीश उदयास आला आहे. या दरम्यान एकूण 573 लोक नवीन अब्जाधीश झाले आहेत. संस्थेने म्हटले आहे की, आम्हाला भीती आहे की यावर्षी दर 33 तासांनी 10 लोकांच्या दराने 26.30 कोटी लोक अत्यंत गरिबीचे बळी होतील. कोविड-19 च्या पहिल्या दोन वर्षांत अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या 23 वर्षांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जगातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती आता जागतिक जीडीपीच्या 13.9 टक्के इतकी आहे. 2000 मध्ये ते 4.4 टक्के होते, जे तीन पटीने वाढले आहे.
बैठकीतील एका सदस्याने सांगितले की, खुप मेहनत करत असल्यामुळे अब्जाधीशांची संपत्ती वाढली आहे असे नाही. तर खाजगीकरण आणि मक्तेदारीमुळे त्यांनी जागतिक संपत्तीचा मोठा हिस्सा बळकावला आहे आणि आपली संपत्ती ‘टॅक्स हेव्हन’ देशांमध्ये लपवून ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.